मोदी पंतप्रधान आहेत की कसाई?- प्रकाश आंबेडकर

0
422

भुसावळ, दि. १९ (पीसीबी) – आपला अभिनंदन जेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात होता, तेव्हा  सगळा देश अभिनंदनच्या पाठिशी उभा राहिला. सगळा देश प्रश्न विचारू लागला की अभिनंदनला कधी सोडणार? तो परत कधी येणार? तो सुखरूप येणार की नाही? त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी चिडले होते. की आता सगळा देश मला विचारतो आहे अभिनंदन कधी परतणार? मोदी पंतप्रधान आहेत की कसाई? असा प्रश्न विचारत भुसावळमधल्या सभेत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रावेरचे बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर आणि जळगावच्या बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर या दोघांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मोदी म्हणतात मी कधीही खोटे बोलत नाही. तसेच पाकिस्तानचे एफ१६ हे विमान पाडल्याचे कुणाला कौतुक नाही, जर मोदी खोटे बोलत नाहीत तर अमेरिकेने हा दावा कसा काय केला की, आम्ही पाकिस्तानला दिलेली सगळी एफ१६ विमाने शाबूत आहेत. जर मोदी खोटे बोलत नाहीत तर काय अमेरिका खोटे बोलते आहे का? मोदी कायम हे पण सांगत आले आहेत की मी मागासवर्गीय आहे. एकदा नरेंद्र मोदींनी त्यांचे एखादे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तरी दाखवावा असेही आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. वंचित आघाडीने जे दोन उमेदवार रावेर आणि जळगावमध्ये दिले आहेत ते समाजासाठी काम करणारे आहेत. ते श्रीमंत घरातून आलेले नाहीत असेही सांगितले तसेच त्यांना निवडून द्या असेही आवाहन केले.

प्रकाश आंबेडकर बोलत असताना त्यांना ऐकण्यासाठी भुसावळच्या स्टेशन परिसरात असलेल्या मैदानावर तुडुंब गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय जेव्हा आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात केला तेव्हा चौकीदार चोर है या घोषणाही देण्यात आल्या. या उपस्थितांना प्रश्न विचारला असता आमचे मत बाळासाहेब आंबेडकरांनाच असेच उत्तर बहुतांश गर्दीतल्या लोकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. एकंदरीत रक्षा खडसे आणि उन्मेश पाटील या दोघांसाठीही ही निवडणूक सोपी नाही हे दाखवणारीच ही सभा होती.