मोदी देशातील मोठे नेते; मात्र, २०१४ सारखी लाट नाही – प्रशांत किशोर

0
971

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते आहेत. मात्र, २०१४ सारखी लाट आता  असल्याचे दिसून येत नाही, असे  निवडणूक रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या तरी भाजप आघाडीवर आहे. परंतु  निवडणुका  या १० ते १२ दिवसांत बदलतात.  आज निवडणूक झाली, तर भाजपच सर्वांत मोठा पक्ष असेल, यात कोणतीही शंका नाही. मात्र, एकट्या भाजपला २७२ जागा मिळणे कठीण  आहे, असेही ते म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी प्रशांत किशोर बोलत होते. ते म्हणाले की, आता लोक वस्तुस्थिती आणि दिलेल्या आश्वासनांवर बोलू इच्छितात. लोकानुनयी आश्वासने त्यांना नकोत. त्यामुळे मला वाटते की, आगामी निवडणुकीत कोणतीही लाट नसेल. ही निवडणूक छोट्या-छोट्या मुद्यांवर लढली जाईल. २०१९ मध्ये लोक उमेदवारांना पाहून मतदान करतील.

देशातील ५० टक्के मतदार सोशल मीडियावर नाहीत. तरीही सोशल मीडियाची २०१९ च्या निवडणुकीत महत्वाची भूमिका असेल. महाआघाडीबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, एकट्या पक्षाला जिंकणे सोपे नसेल. विजयासाठी मोठी आघाडी गरजेची आहे. मात्र, या आघाडीचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. त्याची दिशा निश्चित  असायला हवी.

जेडीयू प्रवेशाबाबत ते म्हणाले की, मला बिहारमध्ये काम करायचे होते.  तसेच नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या कामांमुळे मी खूप प्रभावित झालो. ते देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. जेडीयू एक छोटा पक्ष  असून विचारधारेबाबत बोलायचे म्हटले तर त्यांची पाटी अजून स्वच्छ आहे. त्यामुळेच मी या पक्षात  प्रवेश केला,  असे त्यांनी  सांगितले.