Desh

“मोदी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतात, परंतु त्यांच्या देशातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाऊ शकत नाहीत”

By PCB Author

October 12, 2021

अहमदाबाद, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी बनारस उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले. त्या थेट विमानतळावरून काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या. प्रार्थना केल्यानंतर प्रियांका कुष्मांडा मंदिरात गेल्या. काशीतील त्यांच्या रॅलीदरम्यान प्रियांका यांनी माथ्यावर त्रिपुंड लावले होते. यावेळी त्यांनी जय माता दी च्या गजरात भाषणाला सुरुवात करत किसान रॅलीला संबोधित केले.

यावेळी प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री अद्याप लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना भेटायला गेले नाहीत. पंतप्रधान मोदी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतात, परंतु त्यांच्या देशातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाऊ शकत नाहीत.

“जर आयुष्यात प्रगती नसेल तर माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून सरकार बदला. जे तुम्हाला दहशतवादी म्हणतात त्यांना न्याय देण्यास भाग पाडा. आम्हाला जेलमध्ये टाका, मारा पण जोपर्यत न्याय मिळत नाही आम्ही लढत राहू,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसच्या रॅलीमध्ये प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा एक एक भाग असलेल्या सर्व घटनांचा उल्लेख केला. सोनभद्र हत्याकांड आणि हातरस पासून लखीमपूर खेरी पर्यंत आणि या घटनेत लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू असे प्रियांका गांधी म्हणाल्या.