मोदी, अमित शाह आणि फडणवीसांपेक्षा, राहुल आणि प्रियंका गांधी समंजस-भुजबळ

0
610

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा समंजस कोणी असेल तर ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यासाठी भुजबळ यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचे उदाहरण दिले. जेव्हा पुलवामात हल्ला झाला त्यानंतर काही वेळातच प्रियंका गांधी यांची पहिली पत्रकार परिषद होती. मात्र ती त्यांनी रद्द केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पावणेसहा वाजता सभा घेत होते. योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतली, तर अमित शाह यांनीही सभा घेतली आणि आमचे मुख्यमंत्री युतीच्या वाटाघाटी करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. आता मला सांगा समंजस कोण आहे? असा प्रश्न भुजबळांनी विचारला. नांदेडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

२०१४ च्या आधी जेव्हा निवडणुकांचा प्रचार सुरु होता तेव्हाही पाच जवान शहीद झाले. त्यावेळी अमित शाह म्हटले होते की देशाच्या पंतप्रधानपदी जर नरेंद्र मोदी असते तर आपण लाहोरपर्यंत जाऊन पाकिस्तानला उत्तर दिले असते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हटल्या होत्या की देशाच्या पंतप्रधानपदी असा माणूस आहे जो मौन बाळगून आहे त्यामुळे पाकिस्तानची हिंमत वाढली आहे. मात्र १४ फेब्रुवारीला जेव्हा पुलवामात हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी म्हटले की देशावर संकट आले असल्याने आम्ही सरकारसोबत आहोत. या सरकारला आम्ही सर्वतोपरी साथ देऊ. राहुल गांधींनी जी परिपक्वता दाखवली ती भाजपाच्या एकाही नेत्याने दाखवली नाही अशीही टीका भुजबळ यांनी केली.

१४ फेब्रुवारीला पुलवामा या ठिकाणी हल्ला झाला, या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेमुळे सगळा देश हळहळला. पाकिस्तानला कठोर कारवाईने उत्तर द्या अशी मागणी होते आहे. अशात आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्याच प्रमुख भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.