‘मोदीजी फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा’, युरोपियन महिलेचे मदतीसाठी आवाहन

0
413

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारतातील आपले वास्तव्य विसरता येत नसल्याने अर्थात भारताच्या प्रेमात पडलेल्या मात्र, व्हिसा संपल्यानंतरही भारतात राहिल्याने ब्लॅकलिस्टेड झालेल्या पोलंडच्या एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुन्हा भारतात परतण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली आहे. ‘पासपोर्टनुसार जरी आम्ही भारतीय नसलो तरी मनाने आम्ही भारतीय आहोत. आम्हाला आता केवळ तुमच्याकडून अपेक्षा आहे,’ असे पुन्हा ट्विट करीत भावनीक विनंती तिने पंतप्रधान मोदींना केली आहे.

आपल्या ताज्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करताना तिने म्हटले की, ‘कृपया आमची मदत करा, मला माहिती आहे की तुम्ही खूपच व्यस्त आहात. मात्र, तुम्हीच केवळ आमचे आशास्थान आहात. आम्ही जरी पासपोर्टनुसार भारतीय नसलो तरी मनाने मात्र, आम्ही भारतीयच आहोत. आम्हाला भारतासाठी आम्हालाही हातभार लावायचा आहे. माझी मुलगी सध्या इकडे केवळ भारताच्या आठवणीत जीवन व्यतीत करीत आहे’.

कालच (मंगळवार) तीने ‘आम्ही गुन्हेगार नाही, त्यामुळे पु्न्हा भारतात परतण्याची परवानगी द्यावी’असे ट्विट करीत पंतप्रधान मोदी, गृहमत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पुन्हा भारतात परतण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली होती.

मार्टा कोटलारस्का असे या पोलीश (पोलंड) महिलेचे नाव असून ती एक कलाकार आणि फोटोग्राफर आहे. अलेक्झा असे तिच्या ११ वर्षीय मुलीचे नाव आहे. सध्या या दोघी कंबोडियामध्ये राहत आहेत. २४ मार्चला श्रीलंकेतून बंगळूरूच्या केम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतल्यानंतर मार्टाला ताब्यात घेण्यात आले होते. तिची व्हिसाची मुदत संपल्याने तिला अटक करण्यात येऊन ब्लॅकलिस्टही करण्यात आले होते.