Maharashtra

मोदींसाठी श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत; संजय राऊतांचा टोला

By PCB Author

January 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हणून त्यासाठी अध्यादेश आणणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली. याचा कायदेशीर अर्थ इतकाच आहे की प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे ट्विट करत राऊत यांनी भाजपला टोला  लगावला.

राम मंदिर हा तातडीचा विषय नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. मोदी यांनी तरी वेगळे काय सांगितले. पण या प्रकरणी भूमिका स्पष्ट केल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, याचा अर्थ श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत.

दरम्यान, राम मंदिरासाठी अध्यादेश काढा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने लावून धरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी अयोध्या दौरा केला होता. पंढरपूरमधील पक्षाच्या जाहीरसभेतही त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला  होता.