‘मोदींना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे’: सामनातून रोखठोक सवाल

0
189

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. करोना, लॉकडाउनमुळे ओढवलेलं आर्थिक संकट आणि दुसरीकडे सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. “मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्य़ांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे.

अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्य़ांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही. हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. देशहिताचा विचार आता संपुचित ठरत आहे. पक्षहित व व्यक्तिपूजा म्हणजेच देशहित. राजकारणात फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतकेच शिल्लक राहिले काय, असा प्रश्न पं. बंगालमधील सध्याचे वातावरण पाहून पडतो,” असं म्हणत राऊत यांनी केंद्राला लक्ष्य केलं आहे