Maharashtra

मोदींच्या सभेला जेमतेम लोकं, पवारांच्या सभेला जनसमुदाय लोटला – धनंजय मुंडे

By PCB Author

October 18, 2019

बीड, दि. १८ (पीसीबी) – परळीत पंतप्रधान मोदी यांची महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी सभा झाली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदींच्या सभेला कसलं काय जेमतेम लोकं होती. आपल्या या पवार साहेबांच्या सभेला ४० हजारांच्या वर जनसमुदाय आहे. कारण आपण भावनिक राजकारण करत नाही तर विकासाचे राजकारण करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

महाआघाडीचे अंबाजोगाईचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (शुक्रवार) सभा झाली.  यावेळी धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान  मोदी यांच्या सभेशी पवारांच्या सभेशी तुलना करत जोरदार टीका केली.

मुंडे म्हणाले की, निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. रात्र वैऱ्याची आहे. गाफील राहू नका. आपण जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्याला सार्थ करण्याची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे. म्हणून २१ ऑक्टोबर रोजी घड्याळाचे चिन्ह दाबून विकासाला साथ द्या, असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला यावेळी केले  .