Desh

मोदींच्या सभेनंतर त्या मैदानावर शिंपडण्यात आलं गंगाजल

By PCB Author

February 24, 2021

पश्चिमबंगाल, दि.२४ (पीसीबी) : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जतना पार्टी असा समोरासमोर राजकीय संघर्ष होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी हुगळीमध्ये एका प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेमध्ये दिलेल्या भाषणात मोदींनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र आता ज्या मैदानामध्ये मोदींची ही सभा झाली तेथे मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडलं. आम्ही हे मैदान पवित्र करण्यासाठी गंगाजल शिंपडल्याचंही या टीएमसी कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी या सभेमध्ये तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर खोटे आरोप लावल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटल आहे. पश्चिम बंगाल सरकारसोबत केंद्र सरकार सावत्र असल्याप्रमाणे व्यवहार करते असा आरोपही टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. २४ फेब्रुवारी २०२१ ला ममता बॅनर्जी याच मैदानावर सार्वजनिक प्रचारसभा घेणार आहे. त्यामुळेच टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या सभेनंतर ममतांची सभा होण्याआधी या मैदानावर गंगाजल शिंपडलं आहे.

मैदानावर गंगाजल शिंपडण्याबरोबरच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या सभेसाठी येथे हॅलीपॅड निर्माण करण्यात आलं तेव्हा येथील अनेक झाडं कापण्यात आल्याचा आरोपही केलाय. या ठिकाणी तीन हॅलीपॅड बनवण्यात आले. या हॅलीपॅडच्या निर्मितीसाठी शेकडो वर्ष जुने वृक्ष कापण्यात आल्याचा दावा टीएमसीने केलाय. मैदानावर गंगाजल शिंपडल्यानंतर टीएमसीने हॅलीपॅड असणाऱ्या ठिकाणी वृक्षारोपण मोहीमही राबवली. भाजपाने या सभेसाठी पर्यावरणाची हानी केली असती तरी त्याची भरपाई टीएमसीकडून केली जाईल असंही तृणमूलने म्हटलं आहे.