‘मोदींच्या वाढदिवसानिमित्त कलम ३७० संदर्भात कार्यक्रम आयोजित करा’; शिक्षण विभागाचा शाळांना आदेश

0
446

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – अहमदाबाद जिल्हा शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या एका परिपत्रकामध्ये मोदींचा वाढदिवसानिमित्त कलम ३७० आणि ३५ अ संदर्भातील निर्णयांवर आधारित कार्यक्रम आयोजित करावे असा आदेश सर्व शाळांना दिला आहे. अहमदाबादमधील सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित आणि विना-अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये घटनेतील कलम ३७० च्या निर्णयासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार शाळांमध्ये कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात वादविवाद स्पर्धा, विशेष लेक्चर, निबंध लेखन स्पर्धा, ग्रुप डिस्कशन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

१७ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख या परिपत्रकामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असतो. आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या माहितीचा अहवाल १८ सप्टेंबरपर्यंत माध्यमिक शिक्षण निर्देशकांच्या कार्यालयामध्ये पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.

‘कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात भारतीय संसदेने घेलेला निर्णय हा कौतुकास्पद आणि लोकांच्या चांगल्यासाठी घेतलेला आहे. या निर्णयाचे समान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. या निर्णयामुळे जगभरात देशाची स्तुती केली जात आहे,’ असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.

शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव विनोद राय यांनी अशा कोणत्याही प्रकारच्या परिपत्रकाची मला माहिती नाही असं म्हटलं आहे. तर जिल्हा शिक्षण अधिकारी राकेश व्यास यांनी हे परिपत्रक जारी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. विद्यार्थ्यांना कलम ३७० आणि ३५ अ बद्दल जास्त माहिती मिळवी म्हणून हे कार्यक्रम आयोजित करण्यास सांगण्यात आल्याचेही व्यास यांनी सांगितले आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच या कार्यक्रमांचे आयोजन का करण्यात येत आहे यासंदर्भात प्रश्न विचारला असता ‘आम्हाला कोणत्याही एका दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करायचे होते म्हणून आम्ही पंतप्रधानांचा वाढदिवसच निवडला,’ अशी माहिती व्यास यांनी दिली.

अहमदाबाद जिल्हा शिक्षण विभागाअंतर्गत शहरी आणि ग्रामीण अशा एकूण एक हजार ५० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये दोन लाख ७५ हजारहून अधिक विद्यार्थी शिकतात. शहरांमध्ये एकूण ६०० शाळा असून येथे दीड लाख विद्यार्थी शिकतात. तर ग्रामीण भागात ४५० शाळा असून तेथे सव्वा लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात अधिक माहिती मिळावी असा या कार्यक्रमांचा उद्देश असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.