मोदींच्या वाढदिवशी देशभरातले लसीकरणात असा झाला झोल

0
260

नवी दिल्ली, दि.२३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला देशभरात २.५ कोटी लोकांना लस देत नवा रेकॉर्ड करण्यात आला. मात्र या आकडेवारीमध्ये गडबड असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं कारण त्या दिवशी २७ लाख लस दिल्याची नोंदणी करणाऱ्या मध्य प्रदेशातील काही त्रुटी समोर आल्या आहेत. यामधील काही प्रकार तर आश्चर्यकारक आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अनेकांना तर करोनाची लस घेतली नसतानाही लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.भोपाळमध्ये राहणाऱ्या आशुतोष शर्मा यांना १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता मोबाइलवर एक मेसेज आला. “विद्या शर्माजी, १७ सप्टेंबरला भारताने लसीकरणाचा नवा रेकॉर्ड केला त्याच दिवशी तुम्हाला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस यशस्वीपणे देण्यात आला,” असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. विद्या शर्मा या आशुतोष शर्माच्या आई आहेत. मात्र यामध्ये एकच समस्या होती ती म्हणजे, चार महिन्यांपूर्वीच विद्या शर्मा यांचं करोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे आशुतोष शर्मा यांना धक्काच बसला. त्यांनी आईच्या नावे आलेलं लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करुन सेव्हदेखील केलं आहे.

“माझ्या एका हातात आईचं मृत्यू प्रमाणपत्र असून दुसऱ्या हातात लसीकरण प्रमाणपत्र आहे. मला वाटतं लसीकरणाचा आकडा वाढवण्यसाठी अधिकाऱ्यांवर जास्तच दबाव होता,” असं आशुतोष शर्मा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं.दुसरीकडे असाच एक मेसेज आगर येथील रहिवाशी पिंकी वर्मा यांच्या मोबाइलवर गेला होता. या मेसेजमध्ये पिंकी वर्मा यांना लसीचा दुसरा डोस दिल्याचा उल्लेख होता. २६ वर्षीय पिंकी वर्मा विद्या शर्मा यांच्याप्रमाणे मृत नाही, मात्र यामध्ये राजस्थानमध्ये तिला डोस दिल्याचा उल्लेख होता. “मला ८ जूनला लसीचा पहिला डोस मिळाला. ७ सप्टेंबरला दुसरा डोस घ्यायचा होता, पण आजारी असल्याने ते शक्य झालं नाही. मला वाटतं आकडे वाढवण्यासाठी ते मुद्दामून करत आहेत,” असं पिंकी शर्माने सांगितलं आहे.

भोपाळच्या लीला सुतार यांनादेखील असाच अनुभव आला आहे. ५४ वर्षीय लीला यांनी २५ मार्चला पहिला डोस घेतला होता. पण नंतर लागण झाली आणि दुसरा डोस त्या घेऊ शकल्या नव्हत्या.

दरम्यान या सर्व प्रकरणी सरकारने कर्मचाऱ्यांकडून चूक झाली असावी असं उत्तर दिलं आहे. “असं एक किंवा दोन प्रकरणं असतील. पण जर काही चूक झाली असेल तर तपास करु,” असं मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितलं आहे.