Maharashtra

मोदींच्या दबावामुळे शिवस्मारकाची उंची कमी केली; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात  

By PCB Author

November 17, 2018

अकोला , दि. १७ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभा केला आहे.  या पुतळ्याच्या माध्यमातून आपले नाव अजरामर राहण्यासाठी मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणत अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यास सांगितले, असा  आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  केला.

अकोल्यात  पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, की मी शिवाजी महाराज स्मारक समितीचा अध्यक्ष असताना आम्ही पुतळ्याचा आराखडा  तयार केला होता. १८२ मीटर पेक्षा उंच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होतो.

शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या टोकातून मुंबईचे निरिक्षण करता येईल, अशी व्यवस्था आम्ही करणार होतो. मात्र, वल्लभभाई पटेल यांच्या पेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा उंच  नसावा, यासाठी मोदींनी  दबाव टाकल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची पुतळ्याची  उंची कमी केली. मात्र, महाराष्ट्रात सहा महिन्यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यास महाराजांच्या पुतळ्याचे  मुळ डिझाईननुसार स्मारक बनविणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.