मोदींची केदारनाथ जवळील गुहेत ध्यानधारणा

0
570

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज( शनिवारी) सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आता पंतप्रधान मोदी केदरानाथ जवळील एका गुहेमध्ये ध्यानाला बसले आहेत. मोदी स्वत: २ किलोमीटर पायी चालत गुहेपर्यंत गेले. सकाळपर्यंत मोदींची ही ध्यान धारणा चालणार आहे.

केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी परिसरात सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले. तिथे त्यांनी विधीवत पूजा केली आणि विजयासाठी साकडे घातले. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर  मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक गढवाली पोशाखही परिधान केला होता. नरेंद्र मोदी हे १९ तारखेला म्हणजेच उद्या बद्रीनाथाच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.  केदारनाथ मंदिराबाहेर आल्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या भाविकांचीही  मोदींनी भेट घेतली.   काही भाविकांनी फूल देऊन  मोदींचे स्वागत केले.