Desh

मोदींची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी होईल – माजिद मेनन

By PCB Author

September 17, 2018

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांची अवस्था ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’ अशी होईल, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी केले आहे. मेनन यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांनी इंदूरमध्ये बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली   होती. यावर प्रतिक्रिया देताना माजिद मेनन म्हणाले की, मोदींची अवस्था अशी झाली आहे की, ते कट्टर हिंदुत्ववादाच्या भूमिकेपासून दूर गेले की, संघ व इतर संघटनांकडून त्यांच्यावर दबाव येतो. आता त्यांचा बोहरा समाजाकडे जाऊन मुसलमानांना पक्षाकडे आकर्षित करण्याचा  प्रयत्न दिसतो.

त्यामुळे त्यंची ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’  अशी अवस्था होईल, असेही ते म्हणाले. आता कोणत्या बाजूला झुकायचे ते पंतप्रधानांवरच अवलंबून असेल. असे नको व्हायला की ते इकडचेही नसतील आणि तिकडचेही नसतील. दुर्दैवाने त्यांची अवस्था तशीच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे ते म्हणाले.