Desh

मोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश

By PCB Author

December 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – भाजपाचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश आले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाकडून छत्तीसगड राज्य हस्तगत केले आहे. आजवरच्या निकालांच्या अंदाजानुसार, राजस्थानचा किल्ला देखील भाजपच्या हातून निसटताना दिसत आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपाचा हा पहिला पराभव आहे.

दरम्यान, पंजाब आणि कर्नाटकात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र पंजाबमध्ये भाजपा एनडीएचा भाग होता. येथे भाजपा हा मुख्य पक्ष नव्हता. तर कर्नाटकात काँग्रेस आधीच सत्तेमध्ये होती. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची ही विजयी जोडी गेल्या साडेचार वर्षांत काँग्रेसचा एक एक गड खालसा करीत आली आहे. मात्र, आता हा विजयरथ थांबला आहे.

काँग्रेसमध्ये संजीवनी भरण्याचा प्रयत्न करणाऱे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसाठी लोकसभा निवडणुकांपूर्वी मिळालेला हा सर्वांत मोठा विजय आहे. हा योगायोग आहे की, राहुल गांधी यांनी काँग्रेसची कमान सांभाळल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर त्यांना हा मोठा विजय मिळाला आहे. राहुल गांधी यांनी आजच्याच दिवशी ११ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसचे निर्विरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.