मोदींचा नाशिक दौरा; मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप

0
490

नाशिक दि. १९ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील सभेचा परिसर बुधवारीच एनएसजी कंमांडोंनी ताब्यात घेतला असून, संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बुधवारी सायंकाळी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी (दि. १९) होणाऱ्या सभेला तिहेरी कवच प्राप्त झाले आहे. राज्यातील भाजपच्या प्रचाराची सुरुवातच नाशिकमधून होणार असल्याने मोदी आणि फडणवीस यांच्याकडून राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा या सभेत होण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तवली जात आहे.

मोदी, फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ आणि खासदार, आमदार सभेला उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभेच्या माध्यमातून भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडला जाणार आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून भाजपकडून मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी शहराला भगवेमय करण्यात आले. सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मोदींच्या या सभेसाठी जय्यत तयारी झाली आहे. या सभेमुळे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी नेत्यांची मांदियाळी राहणार असल्याने शहरातील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. तपोवन परिसराला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे. पोलिस आणि स्पेशल कंमाडो आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत.