मोदींचा खासगी नोकरदारांसाठी महत्त्वाचा निर्णय; ग्रॅच्युटी मिळण्याचा किमान कालावधी ३ वर्षे करणार

0
2733

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – मोदी सरकार खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या नोकरदारांसाठी लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. खासगी नोकरदारांसाठी ग्रॅच्युटीसाठी आवश्यक असलेला किमान कालावधी सध्या ५ वर्षे आहे. हा कालावधी ३ वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा विचार सरकार करत असल्याचे सूत्रांकडून समजते. या निर्णयामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये ३ वर्षे नोकरी केल्यास त्याला ग्रॅच्युटीचा लाभ घेता येईल. यामुळे लाखो नोकरदारांना आर्थिक फायदा होणार आहे.  

अनेक वर्षापासून कामगार संघटना खासगी क्षेत्रामध्ये ग्रॅच्युटीसाठी नोकरीचा कालावधी कमी करण्याची मागणी करत आहेत. खासगी नोकरीबाबतची अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत आहे. सतत कामावरून कमी करण्याची टांगती तलवार नोकरदारांवर असते. या परिस्थिती ते काम करत असतात. त्याशिवाय अधिक पगाराच्या लालसेने कर्मचारीदेखील एकापाठोपाठ नोकरी बदलतात. मात्र, नोकरी बदलत राहिल्याने त्यांना ग्रॅच्युटीच्या लाभापासून वंचित राहावे लागते. ५ वर्षांच्या आत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी न मिळाल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे ग्रॅच्युटीचा कालावधी ३ वर्षे केल्यास नोकरदारांना आर्थिक लाभ होणार आहे.

दरम्यान, कामगार मंत्रालयाने आता ग्रॅच्युटीचा कालावधी कमी केल्यास काय परिणाम होईल, याबाबत उद्योग क्षेत्राला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय कामगार मंत्रालयही ग्रॅच्युटी मोजण्याच्या पद्धतीतही बदल करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार ग्रॅच्युटी ३० दिवसांच्या पगारानुसार देण्याचा विचार आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या १५ दिवसांच्या पगारानुसार ग्रॅच्युटी दिली जाते.

ग्रॅच्युटी नोकरदारांच्या पगाराचा एक भाग आहे. तो कंपनी किंवा एम्पलॉयर तुमच्या अनेक वर्षांच्या नोकरीच्या मोबदल्यात देत असतो. ग्रॅच्युटी ही अशी लाभदायी योजना आहे जी निवृत्ती लाभांचा भाग आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आर्थिक मोबदला देत असते.