मोदींऐवजी सुषमा स्वराज पंतप्रधान असत्या, तर सरकार अधिक यशस्वी असते-दिग्विजय सिंह

0
735

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदीं ऐवजी  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देशाच्या पंतप्रधान असत्या तर त्यांचे सरकार अधिक यशस्वी ठरले असते, असे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.  एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आघाडीचे राजकारण देशाच्या राजकारणासाठी आवश्यक आहे. कारण ही विचारधारेची लढाई आहे.  देशाच्या हितासाठी गांधींजी, पंडित नेहरु, राममनोहर लोहिया  आणि कांशीराम यांची विचारधाराच चालू शकते. गोडसे आणि गोळवलकर यांची विचारधारा यशस्वी ठरु शकणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपण कधी संघाला दहशतवादी संघटना म्हटलेले नाही. आम्ही आरएसएसवर बंदीबाबत बोललेलो नाही. जी बंदी केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर घालण्यात आली होती. जी बंदी केंद्र सरकारच्या परिसरात शाखा सुरु करण्याबाबत होती. तीच बंदी मध्य प्रदेशमध्ये हटवण्यात आली होती. ती बंदी आम्ही पुन्हा लागू करण्याबाबत भाष्य केले होते, असे सिंह म्हणाले.

जर संघाला आमच्या प्रस्तावामुळे इतका त्रास होत असेल तर त्यांनी मोदींना बंदी हटवून लष्कर आणि बीएसएफच्या ठिकाणांवर संघाच्या शाखांना परवानगीची मागणी करावी. मी मायावतींचा खूप आदर करतो. अखिलेश माझ्या मुलाप्रमाणे आहेत. मुलायम सिंह यांचाही मी आदर करतो. त्यांच्याबरोबर विचारधारेची आघाडी व्हावी, असे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले.