Desh

मोठी बातमी: हिमाचल प्रदेशात १७ ट्रेकर्स झाले बेपत्ता; ITBPकडून सुरु

By PCB Author

October 21, 2021

हिमाचल प्रदेश, दि.२१ (पीसीबी) : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात सतरा ट्रेकर्स बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. त्यानंतर किन्नौर जिल्ह्यातील चितकुलला निघालेल्या ट्रेकरच्या शोधासाठी यंत्रणा सक्रिय झाले आहे. किन्नौर प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आयटीबीपीची टीम पहाटे साडेचारच्या सुमारास शोध मोहिमेसाठी रवाना झाली आहे. त्याचबरोबर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. हे ट्रेकर्स १४ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशीला लागूनच असलेल्या किन्नौरमधील चितकुलसाठी निघाले होते. पण १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीत खराब हवामानादरम्यान ते बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लामखागा पास हा किन्नौर जिल्ह्याला उत्तराखंडमधील हर्षीलशी जोडणारा सर्वात कठीण मार्ग आहे. किन्नौरचे उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी सांगितले की, पोलीस आणि वनविभागाची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किन्नौर स्वाती डोगरा यांनी सांगितले की, आयटीबीपीशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. ट्रेकर लामखागा खिंडीच्या जवळ असल्याची माहिती आहे. आयटीबीपीची टीम गुरुवारी सकाळी त्यांच्या शोधासाठी बाहेर गेली. हे ट्रेकर्स उत्तराखंडमधील हर्षिल येथून हिमाचलच्या चितकुल ट्रेकिंग मार्गावर लामखागा खिंडीतून निघाले होते. १७ ट्रेकर्सची टीम मंगळवारी चितकुलला पोहोचणार होती, पण ते पोहोचू शकले नाहीत. तसेच त्यांची कोणताही माहिती मिळू शकला नाही. आता आयटीबीपीच्या बचाव पथकाच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जाईल. भारत-चीन सीमेवर लांब पल्ल्याच्या गस्तीवर आयटीबीपी टीमसोबत जाताना बेपत्ता झालेले तीन पोर्टर बुधवारी मृत आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गस्तीवरून परतत असताना पोर्टरचा मार्ग चुकला आणि ते आयटीबीपी टीमपासून वेगळे झाले, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले.