मोटर सायकलवरुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीघा सराईत दुचाकी चोरांना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.३०) मार्च ला आळंदीरोड येथील मयुरी मंगल कार्यालय समोर करण्यात आली. कारवाई दरम्यान त्यांच्याकडून एकूण चार लाख रुपये किमतीच्या तब्बल २० दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी सराईत दुचाकी चोर प्रदिप उर्फ फंट्या दत्तात्रय करवंदे (वय २३, रा. कान्हेवाडी, ता. खेड), गणेश गोपाळ मेदगे (वय २२, रा. अवदर, ता. खेड) आणि गोट्या उर्फ कैलास बबन पारधी (वय ३६, रा. ठाकरवाडी, कडूस, ता.खेड) यांना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.३०) मार्च ला भोसरी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक चामले, पोलीस हवालदार चव्हाण, गवारी, जाधव व साबळे हे भोसरी परिसरातील मयुरी मंगल कार्यालय, आळंदीरोड येथे गस्त घालत होते. इतक्यात त्यांना दोन दुचाक्यांवरील चार इसम संशयीत रित्या फिरताना दिसले. यामुळे त्या तीघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे त्यांच्या गाडीची चौकशी केली असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर पोलीसांनी त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेली दुचाकी (एमएच/१४/एफए/५१२०) व (एमएच/१४/बीडी/५१६०) या दोन्ही दुचाक्यांची माहिती घेतली असता या दोन्ही दुचाक्या खेड येथून चोरीला गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी भोसरी, एमआयडीसी भोसरी, खेड, आळंदी, शिरुर, चाकण असे प्रत्येकी एक व इतर पोलीस ठाण्यात १२ दुचाक्या व एक मोपेड गाडी अशा एकूण चार लाख रुपये किमतीच्या तब्बल २० दुचाक्या चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, संदिप गवारी, विपूल जाधव, दिपक साबळे, किरण जाधव, विजय तेलेवार, नितीन खेसे यांच्या पथकाने केली आहे.