मोठी कारवाई: निगडी आणि मोशी येथील दोघा सराईतांच्या घरातून सात पिस्तूल आणि पंधरा काडतुसे जप्त

0
2564

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – निगडी आणि मोशी येथे राहत असलेल्या दोन सराईत रेकॉर्ड वरील गुन्हेगाराच्या घरातून एकूण सात देशी बनावटीच्या पिस्तूल आणि पंधरा जीवंत काडतुसे असा एकूण १ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या गुन्हेशाखेने केली.

अनुप नवनाथ सोनवणे (वय २८, रा. अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) आणि अवधूत जालिंदर गाढवे (वय २६, रा. मोशी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना त्यांच्या खबऱ्याकडून निगडी ओटास्कीम येथे राहत असलेला आरोपी अनुप सोनवणे याने त्याच्या घरात मोठा शस्त्रसाठा जमा केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावर पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, दिपाली मरळे यांनी त्यांच्या स्फाटसह सोनवणे याच्या ओटास्कीम येथील घरावर धाड टाकली. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सोनवणेच्या घरामध्ये  ५ पिस्तुल आणि १३ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्याकडील दोन पिस्तुल या मोशी प्राधिकरण येथे राहत असलेल्या अवधूत गाढवे या तरुणाला विकल्याचे सांगितले.  पोलिसांनी अवधूत याला सुध्दा अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून एकूण सात देशी बनावटीच्या पिस्तूल आणि पंधरा जीवंत काडतुसे असा एकूण १ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी तपास करत आहेत.

दरम्यान, दोघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून अवधूत गाढवे हा मेकॅनिकल इंजीनियर असल्याचे समजते.