Pune Gramin

मोठी कारवाई : देहूरोडमध्ये ४ देशी पिस्तुल आणि २२ जिवंत काडतुसांसह तिघांना अटक

By PCB Author

June 04, 2019

देहूरोड, दि.४ (पीसीबी) – चार देशी पिस्तुल आणि तब्बल २२ जिवंत काडतुसांसह खंडणी दरोडा विरोधी पथकाने तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक टॅक्सी देखील ताब्यात घेतली असून एकूण ४ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मारूती विरभद्र भंडारी (वय ३०, रा. देहूरोड), सुलतान युसूफ खान (वय ३०, रा. देहूरोड) आणि सुमित उर्फ नकली मारी गणेश पिल्ले (वय २७, रा. विकासनगर देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यांच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात अनअधिकृतपणे हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली होती कि, देहुरोड येथील काही तरुण विना परवाना पिस्तूल बाळगत असून त्याची विक्री करतात, यावर खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास देहुरोड येथील बापदेवनगर कॉलनी आणि आदर्शनगर भागात सापळा रचून तिघा आरोपींना (एमएच/१४/एफसी/१६२६) या क्रमांकाच्या टॅक्सीसह ताब्या घेतले. टॅक्सीची झडती घेतली असता त्यामध्ये चार देशी पिस्तुल आणि तब्बल २२ जिवंत काढतूस आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बढे अधिक तपास करत आहेत.