“मोठमोठी लोकं अक्कल सांगायला इथे आलेली”

0
506

सिंधुदूर्ग, दि. १३ (पीसीबी) – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेला कलगीतुरा अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा विजय झाला असून नारायण राणे यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर खोचक टीका केली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

नारायण राणेंनी यावेळी निवडून आलेले मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. “११-७ ने आपण त्यांचा पराभव केला आहे. जिल्ह्यात मोठमोठी लोकं आली. फार काही बोलली. ही लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील”, असं राणे म्हणाले आहेत. राणेंचा इशारा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंवर अकलेचा उल्लेख करत अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यावर नारायण राणेंनी अजित पवारांवर पलटवार देखील केला होता.
“सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही”, असं अजित पवार म्हणाले होते.