मोक्क्यातील फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी केले अटक; २ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त

0
1664

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – मोक्क्यातील एका फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्याकडून  घरफोडी आणि जबरी चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून तब्बल २ लाख २२ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

लक्कडसिंग शितलसिंग दुधानी (वय २९, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकारनगर पोलीस ठाण्यातील एक आणि हिंजवडी पोलिस ठाण्यातील एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्कडसिंग याच्यावर तळेगाव पोलीस ठाण्याने मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. मात्र या प्रकरणी तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. भोसरी पोलीस हद्दीतील एका गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटली. यावर भोसरी पोलीसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लक्कडसिंग याला हडपसर येथून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दीड महिन्यांपूर्वी तीन साथीदारांसोबत मिळून मुंबई- बेंगलोर हायवे रोडवर लिफ्टच्या बहाण्याने कारला थांबवून चालकाला चाकूचा धाक दाखवून कार चोरली. त्या कारचा उपयोग करून त्याने पिंपरी चिंचवड परिसरात बऱ्याच ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून भोसरी पोलीस ठाण्यातील चार, सहकारनगर पोलीस ठाण्यातील एक आणि हिंजवडी पोलिस ठाण्यातील एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले. तसेच २ लाख २२ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.