मोक्कातील फरार गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
502

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – मोक्का लावण्यात आलेल्या एका फरार सराईत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि.१७) वाकडमधील भूमकर चौक परिसरात करण्यात आली.

राज भारत लोखंडे (वय २३, रा.श्रीनगर, रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, मोक्का लावण्यात आलेला एका सराईत फरार गुन्हेगार वाकड भूमकर चौक येथील जिंजर हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार कन्हेरकर यांना मिळाली होती. यावर वाकड पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी राज लोखंडेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर मोक्का लावण्यात आल्याचे समोर आले. मात्र या प्रकरणी तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. राज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात हत्यार बाळगणे आणि खुनाच्या प्रयत्नाचा तसेच हिंजवडी आणि निगडी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. त्याला पुढील तपासासाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी कन्हेरकर, जगदाळे, गंभीरे, कुदळ, चव्हाण यांच्या पथकाने केली.