मैत्रिणीसोबतचा संपर्क बंद केला म्हणून मैत्रिणीच्या आईची सोशल मिडीयावर बदनामी

0
235

चिखली,दि.१५(पीसीबी) – मैत्रिणीसोबतची मैत्री आणि संपर्क मैत्रिणीच्या आईने बंद केला. या कारणावरून एका अल्पवयीन मुलीने संपर्क बंद करणा-या मैत्रिणीच्या आईचे अश्लील फोटो तयार करून ते सोशल मिडीयावर अपलोड करत बदनामी केली. हा प्रकार डिसेंबर 2019 पासून 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिखली परिसरात घडला आहे.

पिडीत 41 वर्षीय महिलेने याबाबत बुधवारी (दि. 14) चिखली पोलीस ठाण्यात मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणी विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलीची एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री होती. काही कारणांमुळे फिर्यादी यांनी त्यांची मैत्री आणि संपर्क बंद केला. या कारणावरून अल्पवयीन मुलीने फिर्यादी यांना त्रास देण्याच्या आणि अपमान होण्याच्या उद्देशाने त्यांचे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्यावर फिर्यादी यांची वैयक्तिक माहिती देऊन फिर्यादी यांच्या चेहरा वापरून त्यांचे अश्लील फोटो तयार केले. ते अश्लील फोटो आणि अपमानास्पद मजकूर लिहून तो सोशल मिडीयावर प्रसारित केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.