Maharashtra

मेल्यावर पाणी पाजायला येणार का – आशिष शेलार

By PCB Author

May 24, 2020

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला हरवल्यानंतर राज्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करु, असे सांगितले. हा म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला जाण्यासारखा प्रकार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, आर्थिक पॅकेज, लॉकडाऊन आणि विरोधकांचे राजकारण या मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले. यावेळी त्यांनी सध्या कोरोनाचा सामना करणे हा प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले. त्यामुळे आता आरोग्य सुविधा देतो, नंतर आर्थिक पॅकेज देईन, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. शेलार यांनी अगदी कठोर शब्दांत त्यावर भाष्य केले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा आशिष शेलार यांनी ट्विट करून समाचार घेतला. शेलार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आधी कोरोनाला हरवणार मग पॅकेज देणार म्हणतात. आमच्या कोकणी भाषेत याला मेल्यावर पाणी पाजायला जाणे म्हणतात. मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या अशी मागणी करायचात, ते काय होते? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. तसेच आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि दिशा दररोज बदलत असल्याचाही टोला लगावला. एकदा म्हणता महाराष्ट्राला पावसाळ्यापूर्वी कोरोनामुक्त करु. एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडेच दिले नाहीत. आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दिशा दररोज बदलत असल्याची टीका शेलार यांनी केली.