Bhosari

मेलआयडी हॅक करून कंपनीच्या ग्राहकांना केले बदनामीकारक मेसेज

By PCB Author

April 28, 2022

– ११५० कामगारांचा मृत्यू झाल्याने पीएफ मधून बाहेर पडत असल्याची दिली चुकीची माहिती

दिघी, दि. २८ (पीसीबी) – ई-मेल हॅक करून ग्राहकांना कंपनीची बदनामी करणारा मजकूर पाठविला. तसेच कंपनीतील आणि कंपनी सोडून गेलेल्या तब्बल १ हजार १५० कामगारांचा मृत्यू झाला असून ते पीएफ अकाउंट मधून बाहेर पडत आहेत, अशी चुकीची माहिती दिली. ही घटना २० ते २५ एप्रिल दरम्यान घडली.

भरत कुमार लोमटे (वय ३४, रा. रॉयल पार्क, आळंदी रोड, वडमुखवाडी) यांनी बुधवारी (दि.२७) याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोमटे यांची एसआयएस फॅसिलिटी नावाची कंपनी आहे. या कंपनीचा sisindiaprivatelimited@gmail.com हा ई-मेल आयडी आहे. तसेच फिर्यादी यांची श्री विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाची आणखी एक कंपनी आहे. या कंपनीचा ई-मेल आयडी sisind2020@Gmail.com हा दुसरा ई-मल आयडी आहे. हे दोन्ही ई-मेल आयडी हॅक करून अज्ञात व्यक्‍तीने फिर्यादी लोमटे यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या ग्राहकांना कंपनीची बदनामी करणारा मजकूर पाठविला.

तसेच पीएफ साईटवर जाऊन एसआयएस फॅसिलिटी आणि श्री विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस मधील कामगार आणि कंपनी सोडून गेलेले तब्बल 1 हजार 150 कामगार यांचा मृत्यू झाला असून ते पीएफ अकाउंट मधून बाहेर पडत असल्याबाबत आरोपींनी चुकीची माहिती दर्शवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.