मेरी कोमचे एक पाऊल पुढे

0
241

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – वय वाढले तरी आपल्यातील जोश,जिद्द कुठेही कमी पडलेली नाही. आपली विजयाची भूक अजून पहिल्यासारखीच आहे, हे मेरीने आजच्या लढतीमधील आपल्या खेळाने दाखवून दिले. वयाच्या ३८व्या वर्षीही खेळताना तिने आपण पदकासाठी किती आतुर आहोत याचाच जणू प्रत्यय दिला. ऑलिंपिकच्या आणखी एक पदकाकडे तिने पाऊल टाकले. आता तिची गाठ कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित व्हॅलेन्सिया व्हिक्टोरियाशी पडणार आहे.

मेरीचा आजचा खेळ कमालीचा सहज होता. तिचा विजय अपेक्षितच होता.पण, ज्या पद्धतीने ती आजची लढत खेळली ती बघता तिला रोखणे आता आव्हानात्मक असेल. डॉमिनिका रिपब्लिकच्या मिग्युलिना हर्नाडेझवर तिने पूर्ण वर्चस्व राखले. अनुभव आणि दर्जाची तुलना केल्यास हर्नाडेझ खूपच कमी होती.त्याचा फायदा मेरीने अचूक उचलला. त्यामुळे मेरीने ही लढत तीन फेऱ्यांपर्यंत खेळणे अपेक्षित नव्हते. पण, तिने तीन फेऱ्या करून जरा सराव करून घेतला असे देखिल म्हणता येईल. वय वाढले असले,
तरी त्याचा तिच्या खेळावर काही एक परिणाम झालेला नाही. तिच्या हालचाली पहिल्या इतक्याच सहज आणि चपळ होत्या. त्यामुळे जज्जेसच्या ५-० अशा निर्णयाचे फारसे आश्चर्य वाटले नाही.

अर्थात, दुसऱ्या दिवशी मणिपूरी किती कणखर आहेत हे दिसून आले असे म्हणायलाही पूर्ण वाव आहे. पहिल्या दिवशी मणिपूरच्याच मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. आज त्याच मणिपूरच्या चार मुलांची आई असणाऱ्या मेरीने पदकाच्या आशा उंचावल्या. मणिपूरच्या लोकांना कठोर मेहनत घेण्याची सवय असते. मेरीच्या खेळातून हेच दिसून येत होते. करोनाच्या संकटकाळातून बाहेर पडताना मेरीला देखिल अनेक संकटाचा सामना करावा लागला. इतरांप्रमाणेच ती देखिल सरावाला मुकली होती. वेगळेपण इतकेच होते की घरी होती. त्यामुळे चार मुलांना इतके दिवर आपल्या आईबरोबर राहता आले होते. मात्र, सरावाला सुरवात झाल्यावर आता मेरी कौशल्यापेक्षा आरोग्य पणाला लावणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी जपानला आली आहे. त्यामुळेच हा पहिला विजय तिने लढतीनंतर आपल्या मुलांना अर्पण केला.

भारताच्या दुसऱ्या लढतीत मनिष कौशिक रिंगणात उतरला. स्पर्धेतील ६३ किलो वजन गटातील या लढतीत मनीषकडून अपेक्षा होत्या. पण, तो त्या पूर्ण करू शकला नाही. अर्थात, तो एकतर्फी हरला असे म्हणता येणार नाही. त्याने ब्रिटनच्या मॅकॉरमॉकला निकाराची लढत दिली. मनीषने रिंगमध्ये उतरल्यावर पहिली फेरी फारशी गांभीर्याने घेतली नाही. प्रतिस्पर्धी तिसरा मानांकित असला, तरी मनीष कमालीचा निश्चिंत दिसून आला. पहिल्या फेरीतील हा गाफिलपणाच त्याला शेवटी महाग पडला असे म्हणायला हरकत नाही. दुसरी फेरी मग मनीष तुफान खेळला. त्याने संधीचा फायदा घेत ही फेरी जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या फेरीत देखिल त्याने तोच जोश ठेवला होता. त्याने मॅकॉरमॉकला दडपणाखाली आणले होते. बचावही त्याने चांगला राखला होता. पण, शेवटच्या एका मिनिटात मॅकॉरमॉकचे पंच मनीषला अचूक लागले आणि त्याच पंचने लढतीचा निकाल फिरवला. अगदी थोडक्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

मनीष चांगला खेळाडू आहे. त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आता अनुभव त्याला परिपक्व बनवेल. आज जरी तो हरला असला, तरी तो यातून खचून जाणार नाही. ऑलिंपिकमधील पराभव बोचणारा असतो हे खरे आहे. पण, परिस्थिती बदलली आहे. त्याच्यापुढे अजून खूप बॉक्सिंग शिल्लक आहे. तो नक्कीच भविष्यात चांगले यश मिळवेल यात शंका नाही.