मेथी समजून गांजाच्या पानांची भाजी बनवून खाल्ली

0
360

प्रतिनिधी दि २ जून(पीसीबी) : उत्तर प्रदेशमधील कनौज येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. तेथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. कनौज येथील मियागानी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. एका भाजी विक्रेत्याने मेथीच्या नावाखाली या कुटुंबातील निलेश नावाच्या व्यक्तीला चक्क गांजाची जुडी विकली. घरी आल्यावर निलेशने त्याच्या वहिनी पिंकीला ही भाजी दिली.

दुपारी चारच्या सुमारास पिंकीने भाजी तयार केली. त्यानंतर कुटुंबातील सहा सदस्यांनी ही भाजी खाल्ली. मात्र भाजी खाल्ल्यानंतर काही वेळात या कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ लागला. एक एक करत सर्वांचीच तब्येत बिघडू लागली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र डॉक्टरांना फोन करेपर्यंत कुटुंबातील सर्व सस्यांची शुद्ध हरपली आणि ते बेशुद्ध पडले.

हा काहीतरी विचित्र प्रकार असल्याचे समजून शेजाऱ्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत या सहाही जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असता त्यांना स्वयंपाकघरात कढईमध्ये शिजवलेली भाजी दिसली व भाजीची उरलेली पानेही त्यांना दिसली. ही पाने गांजाची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ही शिजवलेली गांजाची भाजी आणि न शिजवलेली पान दोन्ही ताब्यात घेतलं आहे. या सहाही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.या प्रकरणात पोलिसांनी भाजी विक्रेत्याला ताब्यात घेतले. या भाजी विक्रेत्याची चौकशी केली असता तो निलेशला ओळखतो अशी माहिती समोर आली आहे. आपण केवळ मस्करी म्हणून मेथी ऐवजी गांजाची पानं निलेशला दिल्याचे या भाजीवाल्याने सांगितलं.या प्रकरणात संबंधित कुटुंबाने तक्रार केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे