मेट्रोचे निगडीपर्यंतच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घ्या; अन्यथा आंदोलन – सचिन चिखले

0
220

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाला दिरंगाई होत आहे. चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात राहणा-या नागरिकांचे दळणवळण गतीमान होण्यासाठी हा मार्ग तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, कामाला गती मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे मेट्रोचे निगडीपर्यंत विस्तारिकरण तातडीने हाती घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका आणि मेट्रो प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाने मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. दापोडीपासून पिंपरीपर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हाच मेट्रो मार्ग पिंपरी महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महामेट्रोने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून महापालिकेला सादर केलेला आहे. त्याची शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यासाठी स्थायी समितीने 11 एप्रिल 2021 रोजीच्या सभेत मंजुरी देलेली आहे. महासभेने हा प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठविलेला आहे. त्याला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी देखील मिळालेली आहे. परंतु, कामाचा अद्याप शुभारंभ झालेला नाही.

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गावर तीन स्थानके उभारण्यात येणार आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि चिंचवड स्टेशन येथे पिंपरी पोलीस ठाण्यासमोर असतील, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी अभियंता रामनाथ यांनी दिलेली आहे. या विस्तारित मेट्रो प्रकल्पाच्या खर्चासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे 300 कोटी रुपये मिळणार आहेत. महापालिकेला 147 कोटी रुपये स्वहिस्सा खर्ची घालावा लागणार आहे. याची माहिती महापालिकेने यापूर्वीच जाहीर केलेली आहे. परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाबाबत नाराजी आहे.

सुरूवातीला मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करताना निगडीपर्यंतचा समावेश केलेला नव्हता. नागरिकांची अग्रही मागणी विचारात घेऊन विस्तारिकरणाला मंजुरी देण्यात आली. ही बाब जरी कौतुकास्पद असली तरी याला वर्षभराचा कालावधी उलटून गेलेला आहे. तरी या कामाचा शुभारंभ अद्याप झालेला नाही. केवळ आश्वासनावर नागरिकांना झुलवत ठेवायचे असेल तर नागरिक ते कदापी सहन करणार नाहीत. चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात राहणा-या नागरिकांचे दळणवळण गतीमान होण्यासाठी हा मार्ग तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, कामाला गती मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे.