मेगा नोकभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी आरक्षण आणि नंतरच मेगा नोकरभरतीची मागणी

0
679

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केल्यानंतर राज्य सरकारने मेगा नोकरभरती सुरू करावी. तोपर्यंत मेगा नोकरभरतीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष करून मेगा नोकरभरती सुरूच ठेवली, तर होणाऱ्या विरोधाला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारने मराठा आरक्षण मंजूर होण्यापूर्वी मेगा नोकरभरतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यभरातील हजारो बेरोजगार तरूणांना नोकरीच्या आशेचा किरण दिसला होता. परंतु, मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या विविध संघटनांनी मेगा नोकरभरतीला विरोध केला. मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत मेगा नोकरभरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केली. मराठा संघटनांच्या दबावापुढे झुकत सरकारने मेगा नोकरभरतीला स्थगिती दिली होती. मराठा आरक्षण मंजूर केल्यानंतर सरकारने मेगा नोकरभरतीची पुन्हा घोषणा केली आहे.

या मेगा नोकरभरतीला आता धनगर समाजाकडून स्थगितीची मागणी पुढे आली आहे. आधी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या. त्यानंतरच मेगा नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले मिळाल्यास त्याचा सुमारे दीड कोटी समाज बांधवांना फायदा होणार आहे. त्यामुळे आधी धनगर आरक्षण आणि नंतरच मेगा नोकरभरती करावी, अशी त्यांची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष करून मेगाभरती चालूच ठेवली, तर होणाऱ्या विरोधाला सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.