मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीला लग्नाचे अमिश दाखवून केली आर्थिक फसवणूक

0
347

सांगवी, दि. २ (पीसीबी) – जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने एका तरुणीला लग्नाचे अमिश दाखवले. त्यातून तिच्याशी ओळख वाढवून आईच्या उपचाराचे कारण सांगून तरुणीकडून 91 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न करता तसेच तरुणीशी लग्न न करता तिची फसवणूक केली. हा प्रकार 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

नहुष म्हात्रे उर्फ आदित्य प्रशांत म्हात्रे असे फसवणूक करणा-या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमोनी साईटवरून फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला त्याच्या आईच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून पैसे मागितले. फिर्यादीने देखील विश्वासाने ऑनलाईन माध्यमातून 91 हजार रुपये आरोपीला ट्रान्सफर केले.

एका प्रकरणात एक वर्षापूर्वी मॅट्रिमोनी साईटवरून ओळख करून पैसे घेऊन ते पैसे परत न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून आरोपी नहुष याला पोलिसांनी अटक केली असल्याचे फिर्यादीला समजले. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला त्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घालून लग्न करण्यास नकार दिला. तसेच फिर्यादीकरून घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.