मृत मुलाचे तोंडही पाहू शकला नाही, जिवाला घोर लावणारी एका बापाची व्यथा तो फोटो, तमाम स्थलांतरीत मजुरांची ट्रॅजेडी दर्शविणारा, जरुर वाचा…

0
395

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – लॉकडाऊनमुळे घरी परतणाऱ्या हजारो प्रवाशी मजुरांचे फोटो आणि व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातलाच एक फोटो बिहारमधल्या बेगूसरायमध्ये राहणारे रामपुकार पंडित यांचाही आहे. आपल्या देशातील लाखो स्थलांतरीत मजुरांचे पायी चालणे ही ट्रॅजेडी आहेच, पण पोटच्या मुलाचा मृत्यू झाला तरी बापाला त्याचे अंत्यदर्शन घेता येऊ नये. मयतीला निघालेला बाप तेराव्या पर्यंत पोहचू शकत नाही, हे आपल्या देशाचे चित्र आहे. जीवाला चटका लावणारी हे वृत्त डोळ्यात पाणी आणते.

या फोटोत फोनवर बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाल्याचं दिसतं. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार रामपुकार पंडित यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच ते 11 मे रोजी दिल्लीहून बेगूसरायमधल्या तारा बरियारपूर या आपल्या गावी जायला पायीच निघाले. मात्र, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर यूपी गेटजवळ त्यांना पोलिसांनी रोखलं. यूपी पोलीस त्यांना पायी जाऊ द्यायला परवानगी देत नव्हते आणि रामपुकार यांच्याकडे खासगी गाडीने जाण्यासाठी पैसे नव्हते. रामपुकार यांच्याकडे स्मार्टफोनही नाही आणि त्यांना तो वापरताही येत नाही. असता तर त्यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनचं ऑनलाईन तिकीट काढलं असतं किंवा बिहार सरकारकडे मदतीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असता.

कुठलंच साधन नाही, हातात पैसा नाही, अशा परिस्थितीत रामपुकार तीन दिवस तिथेच अडकून पडले. अखेर एका सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने रामपुकार 15 मे रोजी श्रमिक स्पेशल ट्रेनने बिहारच्या दरभंगाला पोहोचले. तिथून ते खोदावनपूरच्या क्वारंटाईन सेंटरला गेले.

पोलिसांनी रोखलं, भुरट्यांनी लुटलं
सोमवारी रामपुकार यांनी बीबीसीशी फोनवरून बातचीत केली. देशभरात चर्चा होत असलेल्या आपल्या फोटोविषयी बोलताना रामपुकार म्हणाले, “चार दिवसांपूर्वी मुलाचा मृत्यू झाला होता. त्याला शेवटचं बघताही आलं नाही. त्यामुळे किमान त्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमात जाऊन वडील असण्याचं कर्तव्य पूर्ण करावं, असं वाटत होतं.

“पोलिसांनी रोखलं तेव्हा मदतीची याचना करत वणवण भटकलो. तेवढ्यात दोघांनी मला म्हटलं की ते मला सीमेपलीकडे सोडतील. पण त्या दोघांनी मला कारमध्ये बसवलं आणि मारहाण करत माझ्याकडे सगळे पैसे हिसकावून घेतले.”

रामपुकार पुढे सांगत होते, “रात्री एक मॅडमजी जेवण द्यायला आल्या होत्या. त्यांनी त्यांचं कार्डही आम्हाला दिलं होतं. त्यांनाच फोन करून मी सगळं सांगत असताना कुणीतरी माझा फोटो काढला.”

एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना रामपुकार यांनी ज्या ‘मॅडमजी’चा उल्लेख केला त्यांचं नाव सलमा फ्रांसीस आहे. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि दिल्लीतल्या एका सामाजिक संघटनेसाठी काम करतात. सलमांविषयी बोलताना रामपुकार म्हणाले, “त्या माझ्यासाठी आई-बापापेक्षा मोठ्या आहेत. सर्वांनी मला फसवलं तेव्हा त्यांनी मला मदत केली.”

घरी कसे परतले रामपुकार?
आम्ही रामपुकार यांच्याकडून सलमा फ्रांसीस यांचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितलं, “रामपुकार यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी मी दिल्ली साऊथ ईस्टच्या स्पेशल सीपींना विनंती केली. त्यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनच्या तिकिटाची व्यवस्था केली.”

आम्ही दिल्ली साऊथ-ईस्टचे स्पेशल सीपी देवेश कुमार यांच्याशीही संपर्क करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशा अनेक अडचणी आणि अडथळे पार करत रामपुकार आपल्या गावाजवळ पोहोचले. मात्र त्यांना अजून घरी जाता आलेलं नाही. नियमानुसार ते सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलाच्या तेराव्याचा कार्यक्रमही होऊन गेला.