मुस्लीम आरक्षणावरील उध्दव ठाकरेंच्या भूमिकेचे एमआयएमकडून स्वागत

0
1138

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठ्यांबरोबरच धनगर, मुस्लीम व अन्य समाजांनाही आरक्षण मिळायला हवे. मुस्लीम समाजाच्या काही ग्राह्य मागण्या आहेत, त्यांचा विचार व्हायला हवा,  असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी  (दि.३०) पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. याबाबत  ठाकरे यांचे एमआयएम या पक्षाने स्वागत केले आहे. त्यामुळे  राजकीयदृष्ट्या एकमेकांवर कुरघोडी करणारे  शिवसेना व एमआयएम भाजपची कोंडी करण्यासाठी या मुद्यावर एकत्र आल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तरीही  फडणवीस सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांनी म्हटले आहे.  उद्धव ठाकरेंची सकारात्मक भूमिका असून  भाजपनेदेखील यापासून बोध घ्यायला हवा, असे जलील म्हणाले.

मराठा समाजाची ओबीसी किंवा अन्य मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र, मुस्लीमांची मागणी   मान्य केल्याचे जलील यांनी सांगितले. मुस्लीमांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची आपली मागणी आहे. त्यासाठी आंदोलन छेडण्याचा विचार असून  लवकरच घोषणा करण्यात येणार आहे, असे जलील म्हणाले.