“मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू”

0
295

कोल्हापूर, दि.२४ (पीसीबी) : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांचं टेन्शन वाढवलं आहे. मुश्रीफांनी सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावत अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीकडून मुश्रीफांना बऱ्यापैकी पाठिंबा पाहायला मिळाला. आता काँग्रेस पक्षही मुश्रीफांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. काँग्रेस नेते तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुश्रीफांना फुल सपोर्ट दर्शविला आहे.

सतेज पाटील यांनी किरीट सोमय्यांना इशारा देताना मुश्रीफांना पाठिंबा दिलाय. मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली आहे. तसंच इथल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, असं आवाहन देखील सतेज पाटलांनी सोमय्यांना केलंय.

सोमय्यांनी मुश्रीफ साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु मुश्रीफ साहेबांनी यावर खुलासाही केलाय. त्यामुळे खुलासा केल्यानंतर त्यांनी पुन्हा दौरा काढण्याची काही गरज नाही, मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी रोखठोक भूमिका सतेज पाटील यांनी घेतलीय.

किरीट सोमय्या यांनी 28 आणि 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी मी कोल्हापूरला जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तसं पत्र कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं. 20 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना कराडमध्येच रोखून धरलं. सोमय्यांनी तिथेच पत्रकार परिषद घेत मुश्रींफांविरोधात 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. तासाभराच्या आतच मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले.

20 सप्टेंबरला किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्येच उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना 20 तारखेच्या पहाटे कराडमध्ये उतरवलं.

दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर सोमय्यांविरुद्ध दुसरा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. किरीट सोमय्यांनी दुसरा 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर आता आपण 50 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.