मुलीप्रमाणे मुलालाही तो काय करतोय, कुठे जातोय हे विचारण्याची गरज – अश्विनी जगताप

0
1454

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मुलींच्या सुरक्षेसाठी आपण त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने घालतो. त्यांच्यावर संस्कार चांगले करतो. त्यांना खूप जपतो. परंतु, मुलींसारखेच आपण आपल्या मुलाकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. ज्या प्रकारे मुलींवर बंधने घालतो, त्याप्रकारे मुलांनाही आपण विचारले पाहिजे. तू कुठे जातो, मित्र कोण, काय करतो, हे विश्वासात घेऊन विचारल्यास चांगली पिढी निर्माण होईल आणि आपला भारत देश घडेल, असे प्रतिपादन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका आणि भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी सोमवारी (दि. २१) केले.

जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शहरातील कतृत्ववान महिलांचा भरारी पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या रेणुसे-जगताप, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सदस्य उमा खापरे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, अनुराधा गोरखे, नगरसेवक शीतल शिंदे, कुंदन गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, भाजप युवा मोर्चाचे अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.

अश्विनी जगताप म्हणाल्या, “बाहेरच्या बिघडलेल्या वातावरणामुळे घरात मुलगी असणारे प्रत्येक कुटुंब तिची फार काळजी घेत असतात. सुरक्षेसाठी तिच्यावर विविध प्रकारची बंधने घातली जातात. मुलींवर चांगले संस्कार केले जातात. परंतु, आता मुलावरही मुली इतकेच चांगले संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक कुटुंबाने मुलीप्रमाणे आपल्या मुलालाही तो कुठे जातो, त्याचे मित्र कोण, तो कोणत्या वातावरणात फिरतो, तो काय करतो, विचारले पाहिजे. त्यामुळे चांगली पिढी निर्माण होईल आणि आपला भारत देश घडेल. महिलांनी आपल्या मुलांना भारतीय जेवणाची गोडी लावावी. जंकफूडच्या जमान्यात कुटुंबाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. फास्टफूडच्या जमान्यात म्हाताऱ्या झाल्या तरण्या आणि तरण्या झाल्या म्हाताऱ्या या म्हणीसारखी अवस्था होऊ नये, यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याला जपावे, असा सल्लाही त्यांनी दिला.”

सीमा सावळे म्हणाल्या, “समाजातील अनेक महिला चांगले काम करत आहेत. जिजाई प्रतिष्ठान अशा कतृत्वान महिलांचा दखल घेण्याचे काम १९९७ पासून करत आहे. हे कार्य अविरतपणे सुरू आहे. पिंपरी-चिंचवड ही आमची कर्मभूमी असल्याने या शहरासाठी मी कष्ट करत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या शाब्बासकीसाठी जिजाई प्रतिष्ठानमार्फत यापुढेही काम सुरूच राहिल, असे त्यांनी सांगितले.”

यावेळी आमदार महेश लांडगे, ऐश्वर्या रेणुसे-जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जिजाई प्रतिष्ठानकडून ऊर्मिला पाटील (स्कूल बस चालक), मुन्नी पांडे ( कष्टकरी महिला कामगार), सारीका पवार (पापड केंद्र व्यावसायिका), मीना मस्के (शिक्षिका), उल्का कुटे (गृहिणी), निलीमा पाचपोर (शिक्षिका), इशा मुंशी (ब्युटी पार्लर व्यावसायिका), सुजाता भोईटे (चपाती केंद्र व्यावसायिका), शारदा रिकामे (योग प्रशिक्षिका) यांचा भरारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा डफळ यांनी केले. सारंग कामतेकर यांनी आभार मानले.