मुलींच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट गर्ल प्लस’

0
553

पुणे, दि. २७ (पीसीबी) – शहरी भागाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील शालेय मुलींसह महिलांना कौटुंबिक वादविवाद, नैराश्याला सामोरे जावे लागत असल्याने त्यावर उपाय म्हणून आता मोबाइल अॅपद्वारे आरोग्य, शिक्षण, आहार; तसेच रोजगारविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भविष्यात मानसोपचार, गुणवत्ता विकास यावरदेखील अॅपद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मुलींसह महिलांना विविध विषयांवर मोबाइल अॅपद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी ‘स्मार्ट गर्ल प्लस’ नावाने मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते.

‘पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने ‘स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम सुरू आहे. शालेय विद्यार्थिनींना आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण, आरोग्यविषयक जनजागृती यांचे शिबिराद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा कार्यक्रम शाळांमध्ये राबविता जात असून, व्यक्तिगत शंकांचे समाधान होत नसल्याचे आढळले. त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने प्रथमच स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशन कार्यान्वित केले आहे. या अॅपद्वारे कोणत्याही विद्यार्थिनी अथवा महिलेला तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेता येणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.