मुलाच्या वाढदिवसाला बाहेर जाण्यासाठी मित्राची नेलेली कार परत न करता फसवणूक

0
353

चिंचवड,दि.28(पीसीबी): मुलाच्या वाढदिवसासाठी बाहेर जाण्यासाठी मित्राची कार दोन दिवसांसाठी नेली. साडेतीन महिन्यानंतर देखील कार परत न करता कार मालक मित्राची फसवणूक केली. हा प्रकार 12 जुलै 2020 रोजी लिंक रोड, चिंचवड येथे घडला.

गणेश नारायण लोंढे (वय 43, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक खरात (रा. किवळे रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे इनोव्हा क्रिस्टा (एम एच 14 / जी वाय 4113) ही कार आहे. 12 जुलै 2020 रोजी आरोपी खरात आणि त्याचा मित्र सागर कांबळे याने खरात याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बाहेर जाण्याचे कारण सांगून दोन दिवसांसाठी लोंढे यांची कार नेली. ती कार अद्याप पर्यंत खरात याने लोंढे यांना परत केली नाही. लोंढे यांनी कार मागितली असता खरात याने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचा विश्वासघात व फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.