मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची आर्थिक फसवणूक

0
384

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने एका समाजसेवकाला आर्थिक गंडा घातला आहे. हा प्रकार 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी नवी सांगवी येथे घडली. अंबरनाथ चंद्रकांत कांबळे (वय 49, रा. विनायकनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8329773204, 7218175539 क्रमांकधारक अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे समाजसेवक आहेत. 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कांबळे यांच्या मोबाईल फोनवर 8329773204, 7218175539 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने ‘मुलीचे नाव घेऊन तिच्या डोक्यावरून ट्रक गेला असून तिला उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.

कांबळे हे त्यावेळी एका कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी फोनवरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पत्नीला ही हकीकत सांगितली. त्यानंतर कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईल फोनवरून गुगल पेच्या माध्यमातून आरोपीच्या 8329773204, 7218175539 या मोबाईल क्रमांकावर सहा हजार 500 रुपये पाठवले.

त्यानंतर आरोपीने कांबळे यांच्याकडे आणखी 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे कांबळे समक्ष वायसीएम हॉस्पिटलमध्ये गेले आणि फोनवरील व्यक्तीने सांगितलेल्या भाग्यश्री बाविस्कर नावाच्या रुग्णाबद्दल चौकशी केली. त्यावेळी अशा नावाचा कोणताही रुग्ण रुग्णालयात नसल्याची माहिती कांबळे यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.