Maharashtra

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्यांचे मानधन पूरग्रस्तांना देणार   

By PCB Author

August 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपले एक महिन्याचे मानधन  पूरग्रस्तांना देणार आहे.  हा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे, अशी माहिती   मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच मुख्यमंत्रीसुध्दा आपला एक महिन्यांचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.  

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनीही १ लाख रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुर्पूद केला.

दरम्यान, राज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी  ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आटोक्यात येऊ लागली आहे. पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ  कायम आहे.