Maharashtra

मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच भाजपत प्रवेश करणार; प्रवेशकर्त्यांचा आग्रह

By PCB Author

August 22, 2019

औरंगाबाद, दि. २२ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील बहुंतांश दिग्गज नेते भाजपत प्रवेश करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आतापर्यंत ३० हून अधिक नेते भाजप – शिवसेनेत गेले आहेत. अजून काही दिग्गज नेते प्रवेशासाठी योग्य मुहूर्ताची वाट पाहत आहेत. तसेच पक्षांतील इतर कोणत्याही नेत्यांकडून प्रवेश घेणार नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते प्रवेश करणार असा आग्रह प्रवेश कर्त्यांनी भाजप अधिका-यांकडे केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे थांबलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. २७ ऑगस्टला ही यात्रा औरंगाबाद येथे पोहचणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने अनेक दिग्गज नेते भाजपत प्रवेश करणार आहे.

औरंगाबाद येथे होणा-्या जाहीरसभेत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील विद्यमान नगरसेवक तथा माजी नगरसेवक व इतर पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर जाण्याची संधी प्रवेश करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच भाजप प्रवेश करणार असा आग्रह धरला आहे.