मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सभेला जनसागर लोटला; मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची तुडूंब गर्दी

7172

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याआधीच भाजपने महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवडमध्ये सभा आयोजित केली आहे. या सभेला मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनसागर लोटला आहे. निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ही सभा होणार असून, मैदान खचाखच भरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेला एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांनी केलेल्या या प्रचंड गर्दीमुळे आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी आत्मविश्वास मिळाल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

दिवाळीनंतर लोकसभा निवडणुकीची आतषबाजी सुरू होणार आहे. त्याआधीच भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी सभा आयोजित केली आहे. भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणाऱ्या या सभेकडे केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सव्वापाच वाजता सुरू होणाऱ्या या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला जास्तीत जास्त नागरिकांना आणण्यासाठी गेला आठवडाभर जिवाचे रान केले.

मदनलाल धिंग्रा मैदानावर जनसागर लोटल्याने पाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही पिंपरी-चिंचवडमधील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मावळ आणि शिरूर मतदारसंघात भाजपची पाळेमुळे घट्ट झाल्याचे सिद्ध होत आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजप दोन्ही मतदारसंघात ताकदीने उतरणार हे या गर्दीवरून स्पष्ट होते. युती झालीच, तर मावळ मतदारसंघ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला झालेल्या गर्दीबाबत बोलताना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “सभेला झालेली नागरिकांची गर्दी निश्चितच आमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जनता मुख्यमंत्री आणि भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या सभेला झालेल्या गर्दीवरून स्पष्ट होते. विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील जनतेने भाजपला निवडून दिले. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्याच्या दिशेने भाजपने पावले उचलली. मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. शहराचे अजूनही काही प्रलंबित प्रश्न ते लवकरच मार्गी लावतील. आगामी लोकसभा निवडणुकीतही शहरातील जनता भाजपलाच निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”