मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांचा क्रुझवर धोकादायक सेल्फी

0
711

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर एकट्याच जाऊन सेल्फी घेतला. यावेळी त्यांच्या सेल्फी प्रेमामुळे मात्र, अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. तर त्यांनी जीव धोक्यात घातला म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायचा या संभ्रमात पोलीस पडल्याचे दिसून आले.

आजपासून (रविवार) मुंबई गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आली. भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. यावेळी अमृता फडणवीसही हजर होत्या. त्यावेळी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी क्रुझच्या अगदी टोकाला जाऊन सेल्फी का काढला? याचीच आता चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, या क्रुझवर पर्यटकांसाठी शाही सुविधा उपलब्ध आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरूनच या क्रुझला आंग्रिया असे नांव देण्यात आले आहे. याच क्रुझवरून अमृता फडणवीस यांनी सेल्फी घेतला. दरम्यान या धोकादायक सेल्फीची चर्चा सोशल मीडियावर  सुरू झाली आहे.