मुख्यमंत्र्यांचे तुकाराम मुंढेंना अभय; अविश्वास प्रस्ताव अखेर मागे

0
601

नाशिक, दि. ३१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. उद्या (शनिवारी) होणाऱ्या महासभेतील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना या प्रकरणावरून वरिष्ठांकडून जोरदार चपराक बसली आहे. धडक कामगिरीमुळे नवी मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही सर्वपक्षीयांच्या रोषाला तोंड द्यावे लागलेले मुंढे यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यावर उद्या (शनिवारी) सर्वसाधारण सभेत चर्चा होणार होती.

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावत तो पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले. अनावश्यक खर्चाला पायबंद घालत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातला. यामुळे भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांना हादरा बसला. नाशिककरांवर प्रचंड करवाढ लादल्याचे आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाने सुरु केला.

नाशिकमधील स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करताना पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवल्याचे समोर आले होते. मात्र, या प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी या घडामोडींची दखल घेतली आहे.