Banner News

मुख्यमंत्री होण्यासाठी उध्दव ठाकरे तयार नव्हते, मी त्यांना अक्षरशः सक्ती केली – शरद पवार

By PCB Author

October 16, 2021

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या मनसुबा होता, असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चोख उत्तर दिले. स्वतः ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी तयार नव्हते. आमदारांची बैठक घेतली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एक, दोन, तीन अशी नावे पुढे आली होती. नको नको म्हणत असताना मी स्वतः उध्दव ठाकरे यांचा हात वर करून ते मुख्यमंत्री असतील असे जाहीर केल्याचे शरद पवार यांनी आज अवर्जून स्पष्ट केले. ठाकरे यांच्यावर अशा प्रकारे टीका कऱणे योग्य नाही, असेही पवार यांनी फडणवीस यांना सुनावले.

पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शहरात आले आहेत. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, काल उध्दव ठाकरे यांचे जे भाषण झाले त्यावर फडणवीस बोलले. त्यात त्यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचच होते, असे म्हटले आहे. त्याबाबत खुलासा करताना शरद पवार म्हणाले, मी सांगतो आहे. ज्यावेळी हे तीन पक्षांचे सरकार बनवायचे होते त्यावेळी आमदारांची बैठक घेतली होती. मुख्यमंत्री कोणी व्हायचे हा विषय आला त्यावेळी तीन नावे पुढे आली होती. ठाकरे हे त्या पदासाठी तयार नव्हते. मी स्वतः त्यांचा हात सक्तीने वर केला आणि हे मुख्यमंत्री असे जाहीर केले त्याचे सर्वांनी स्वागत केले. केवळ माझ्या आग्रहाखातर ते मुख्यमंत्री पद सांभाळायला तयार झाले. त्यांच्या पक्षाचे जास्त सदस्य होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला. मी ठाकरे यांना अगदी तीन-चार वर्षांचे असताना पासून पाहतोय.

शरद पवार म्हणाले, प्रत्येकाची काम कऱण्याची पधअदत वेगळी असते. कुठे काही संकट असले तर मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत असे. ठाकरे हे पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून आपले काम एका जागेवर बसून काम करत असतात. मुख्यमंत्री झाल्या पासून त्यांनी कोरोनाचे संकट असू दे की नैसर्गिक आपत्तीतसुध्दा त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. कोरोनाच्या संकटातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला बाहेर काढले. त्यामुळे ठाकरे यांच्यावर अशा पध्दतीने फडणवीस यांची टीका मला योग्य वाटत नाही.