मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा दिल्यानंतर  मागील काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते

0
392

मुंबई, दि. १३ (पीसीबी)- विधानसभा निकालाच्या २० दिवसांनंतरही राज्यातील राजकीय तिढा न सुटल्याने अखेर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे राज्याचा सर्व कारभार राज्यपाल पाहणार आहेत. राज्यातील सर्व घडामोडींवर आता थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असेल. या निर्णयामुळे राज्यामध्ये विधीमंडळाचे कामकाज होणार नाही. मंत्रीमंडळही बरखास्त झाले असून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मागील काही दिवसांपासून कार्यरत असणारे देवेंद्र फडणवीसही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमधून मुक्त झाले आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटवरील बायोमध्ये बदल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केला. मात्र राज्यापालांच्या विनंतीवरुन आपणच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार असल्याचे फडणवीस यांनीच राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी राज्यपालांना राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले. मात्र शिवसेनासोबत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नाही असं भाजपाने रविवारी स्पष्ट केलं. त्यानंतर सत्ता स्थापनेचे आमंत्रण मिळालेल्या शिवसेनेला सोमवार संध्याकाळी साडेसातपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंबा पत्रे न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठीचा बहुमताचा आकडा राज्यपालांसमोर मांडता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचा कालावधी देण्यात आला. मात्र हा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यातमध्ये मंगळवारी दुपारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील सर्व निर्णय केंद्र सरकार राज्यपालांच्या माध्यमातून घेईल. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने फडणवीसांवरील काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारीही आपोआपच संपली.

यानंतर फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमध्ये Chief Minister of Maharashtra म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही ओळख बदलली आहे. त्यांनी आता स्वत:ला Maharashtra’s Sevak म्हणजेच महाराष्ट्राचा सेवक असल्याचे ट्विटर बायोमध्ये नमूद केलं आहे.