मुख्यमंत्री फडणवीस भविष्यात पंतप्रधान होतील – महादेव जानकर

0
487

पुणे, दि. ५ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत.  ते  भविष्यात पंतप्रधान होतील, असे भाकित राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. ब्राह्मणांमुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी राजकारणात येऊन आरक्षणाची मागणी करावी, असे जानकर म्हणाले. 

पुण्यात ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने  महादेव जानकर यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ब्राह्मण ही जात किंवा धर्म नसून एक व्यवस्था आहे. ज्या क्षेत्रात, जो माणूस सक्रिय होतो, तो ब्राह्मण होतो, हीच या देशाची व्यवस्था आहे.  ब्राह्मण समाजाने स्वतःला कमी न समजता राजकारणात आले  पाहिजे. ब्राह्मण एक असला तरी लाखाला भारी आहे, हे विसरु नये, असे ते म्हणाले.

या समाजामुळे तेल्याचा चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला, माझ्यासारख्या धनगराच्या मुलाला मंत्रिपद मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत, जे वंचितांसाठी काम करत आहेत. सर्व समाज घटकासाठी काम करणारे फडणवीस आहेत, पुढील काळात ते देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकितही त्यांनी  यावेळी व्यक्त केले. ब्राह्मणांविरोधात कोणी बोलत असेल, तरी काळजी करु नका. मी तुमच्यासोबत आहे. हत्ती आपली चाल चालत असतो, भुंकणारे भुंकत असतात, असेही जानकर म्हणाले.