Maharashtra

मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली आमदारांची बैठक  

By PCB Author

December 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. आगामी निवडणुकीत  महाराष्ट्रातही याचा फटका बसू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खबरदारी घेतली आहे. तीन राज्यातील पराभवानंतर भाजपमध्ये  बैठकांचे सत्र  सुरु झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १९ डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलावली आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेला फटका लक्षात घेता राज्यात भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे.  राज्यात भाजपने निवडणूक तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या पक्षाच्या तयारीचा आणि विकास कामांच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच व्युहरचना निश्चित केली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे संघटनमंत्री, मुख्य पदाधिकारी आणि सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आज (गुरूवार)  मुख्यमंत्री फडणवीस  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर उभय नेत्यांमधील पहिलीच भेट होत आहे. या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या १९ डिसेंबरला भाजप आमदारांची मुंबईत बैठक बोलावली. त्यामुळे मोदी मुख्यमंत्र्यांना काय सल्ला देतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे.