‘मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार?’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

0
247

नाशिक, दि.२९ (पीसीबी) : “उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात. पण राऊत काहीही बोलतात. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार?” अशी खिल्ली मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उडवली. ते नाशिकमध्ये बोलत होते. मनसे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याची घोषणा संदीप देशपांडे यांनी केली.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसदिनी त्यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी खिल्ली उडवली. ‘जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोहचणार?’असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसापूर्वी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावं लागलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी निशाणा साधला.

सध्या संदीप देशपांडे हे अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे, संदीप देशपांडेंनी नाशिकमध्ये मनसेने उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.संदीप देशपांडे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून, नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी अत्यंत दुरावस्था आहे. मनसे काळातील प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करावी. तशी मागणी नाशिक महापालिका आयुक्तांना केली आहे”.

पालिकेच्या इंजिनिअरसनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही, तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. मनसेने उभारलेले प्रकल्प सत्ताधारी भाजप स्मार्ट सिटी म्हणून दाखवते आहे. मनसेच्या कामावर भाजप पोळी भाजप आहे, असा आरोप त्यांनी केला. कामगारांना कोविड भत्ता मिळायला हवा. कालिदास रंगमंदिरात कलाकारांना दुय्यम वागणूक मिळते. आयुक्तांना या सर्व गोष्टींचा इशारा दिलाय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दिवसभरात अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये बोटॅनिकल गार्डनचा समावेश होता. याशिवाय, अमित ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारकालाही भेट देतील.

अमित ठाकरे यांच्या नाशकामधल्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत. म्हणजेच अमित ठाकरेंवर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.